----------------------------------------------------------------------------- पुलावरुन धडधड करत राजधानी एक्सप्रेस निघून गेली. रोजच्या प्रमाणेच आजही भिकू जागा झाला. तो पळत पळत गल्लीत असलेल्या सार्वजनिक नळावर गेला. हात, पाय, तोंड धुतलं. बायको मुलं अजून झोपलेली होती. त्याने समोरच्या हॉटेलातून चहा आणि गरमागरम भजी आणली आणि चहा बरोबर तो भजी खाऊ लागला. भज्यांचा खमंग वास बायको मुलांच्या नाकात शिरला, तशी ती उठली. बायको बघत राहिली. मुलांनी हात, तोंड न धुताच कागदातून भजी ओढून खायला सुरवात केली होती. भजी संपली अन भिकूचं लक्ष कागदाच्या तुकड्याकडे गेलं. 'अरे हा तर आपलाच फोटो..' भिकूच्या तोंडून अभावितपणे बाहेर पडलं. फोटोत तो आपल्या बायको- मुलांबरोबर बसला होता. शेजारी फाटक्या गोधडया, चिंध्यांची गाठोडी ठेवलेली होती. साडीच्या चिंध्या पांघरलेल्या बायकोचा फाटका पदर डोक्यावर होता. मुलं माकडाप्रमाणे दात विचकत होती. भटक्या जिवनाचा तो वास्तव फोटो होता. भिकूने तो फोटो सगळ्यांना दाखवला. फोटोखाली लिहिलं होतं, 'पुलाखालचं घर' . प्रथम पुरस्कार ५००० रु. अजय शर्मा- मुंबई. आता त्याला आठवलं. काही दिवसापूर्वी एक फोटोग्राफर तिथे आला होता. त्या सगळ्यांना निट न्याहळून बघितल्यावर , त्यांचा फोटो काढण्याची ईच्छा त्याने प्रदर्शीत केली. मुलं तर एकदम खुश झाली. त्याने सांगितल्या तशा पोझेस त्यांनी दिल्या. जाण्यापूर्वी फोटोग्राफरने भिकूच्या हातावर ५० रु. ठेवले. त्या दिवशी सगले आनंदात होते. त्या दिवशी सगळ्यांनी भज्यांबरोबर जिलबीही खाल्ली. भिकू आता विचार करु लागला, ५००० रु। म्हणजे किती वेळा ५० रु? ----------------------------------------------------------------
लेखिका - सौ उज्ज्वला केळकर, सांगली
0 comments: